मस्तानी तलाव ,सासवड ,पुणे
सोमवार
१५ जुलै २०१३,
पुण्याजवळचा दिवे घाट ओलांडत सासवडला जाऊ लागलो, की
डावीकडे दरीतील आखीव-रेखीव मस्तानी तलाव सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो. पावसाळ्यात
तर भोवतालच्या साऱ्या डोंगर-टेकडय़ा हिरव्यागार होतात आणि पाण्याने भरलेला हा तलाव
अधिकच उठून दिसतो. या ओल्या दिवसात मुशाफिरीसाठी या दिवेघाटात जरूर वाट वाकडी करावी.
पुण्यापासून साधारण १७ किलोमीटरवर वडकी गाव. या गावातूनच एक गाडी रस्ता डोंगराच्या
अगदी पायथ्याशी तलावावर आणून सोडतो. एरवी घाटातून एक भिंतवजा वाटणारे हे बांधकाम
जवळ जाताच एक बुलंद वास्तू वाटू लागते. सभोवतालचे डोंगर अंगावर येतात. डोंगरांचा
हा वेढा आणि विस्तीर्ण जलाशयाच्या पाश्र्वभूमीवर आपले खुजेपणही जाणवू लागते.
थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमाने खरेतर साऱ्या
पेशवाईचा इतिहासच भारावलेला आहे. या प्रेमाचा स्पर्श पुण्याभोवतीच्या काही
स्थळ-वास्तूंच्या नशिबीही आला. यातलीच ही एक मस्तानी तलावाची जलवास्तू. असे
म्हणतात, शूर योद्धा असलेले बाजीराव पेशवे त्यांच्या विश्रांतीच्या,निवांतक्षणी
पुण्याबाहेर इथे या तलावावर येत असत. इथल्या डोंगर-दऱ्यांच्या, त्यातील
हिरवाईच्या, तिच्या कुशीतल्या या तलावाकाठी चार क्षण घालवत. अथांग पाण्याच्या
सान्निध्यात आणि मस्तानीच्या सहवासात त्यांच्या मोहिमांचा सारा ताण नाहीसा होत
असावा. एका शूर योद्धय़ाचे एक रसिक मनच यातून डोकावते.
महाराष्ट्रात अनेक गावा-शहरांजवळ ऐतिहासिक तलाव आहेत. पण या
साऱ्यांमध्ये वडकीच्या मस्तानी तलावाची जागा, परिसर आणि
त्याचे बांधकाम हे वैशिष्टय़पूर्ण असे आहे. थोरल्या बाजीरावांनी १४ एकर क्षेत्रात
हा तलाव बांधला, पण तत्पूर्वी त्यांनी या जागेचा व परिसराचा चांगलाच अभ्यास केला
होता. या भागात किती पाऊस पडतो, पाणी कुठून खाली येईल, डोंगराला
कुठे चढ-उतार आहेत, या साऱ्याचा तपशिलाने विचार केलेला आहे. या संदर्भात पुण्याच्या
पेशवे दप्तरात एक स्वतंत्र पत्रच आहे. ज्यामध्ये पेशव्यांच्या दोन निरीक्षकांनी
नोंदवलेले वर्णन याप्रमाणे – ‘सेवेसी जगन्नाथ नागेश विज्ञापना ऐसीजे. छ. १२
मोहरमी.. सेवेशी विनंती हेच की, पहिले पूर्वाचे नक्षत्राचे पाणी,
लांबी
उत्तरदक्षण तिही बुरुजांमध्ये सुमारे १०० हात व रुंदी पूर्व पश्चिम अशी नव्वद व
खोली कोठे तीन हात कोठे चार हात येणेप्रमाणे होते पु(ढे) उत्तराचे दोन-तीन पाऊस
बरेच पडले. पूर्वेकडील दोन्ही खोऱ्यांतील ओढे व दक्षणेकडील तल्याचे पालीबाहेरील
ओढे जिले वाहो लागले. ते खणोन बांधोन आणून तल्यात आणिले आहेत..सदरहू लि।। प्रमाणे
लिंगोजी निंबाणेकर व कुसाजी गायकवाड यांनी आपले नजरेने पाहिले..’

आज अडीचशे वर्षांनंतरही तलावाचे बांधकाम खणखणीत उभे आहे. तलावाच्या
भिंती सहा ते बारा फूट जाडीच्या आहेत. यातही पश्चिमेकडची 3बांधाची आडवी भिंत तर
एखाद्या चिरेबंदी किल्ल्याप्रमाणे आहे. या आडव्या भिंतीला तीन बुरुजांनी भक्कम
केले आहे. या बांधकामात जागोजागी छोटय़ा खोल्या,कोनाडे, भुयारी
मार्ग, बसण्यासाठी ओटे-धक्के अशी रचना केली आहे. तलावाच्या काठावर गणेश,
हनुमान
आणि महादेवाची मंदिरे व उघडय़ावर काही देवतांच्या मूर्ती आहेत. या भिंतीवरच पूर्वी
एक महाल होता. त्याच्या खांबांच्या खुणा आजही दिसतात. इथूनच एक भुयारी मार्ग
तलावाशेजारच्या विहिरीत उतरतो. या तलावाशेजारी पूर्वी घोडय़ाची पागाही असल्याचे
इथले गावकरी सांगतात. थोरल्या बाजीरावांनी बांधलेल्या या तलावावर नानासाहेब पेशवे
यांनी इसवी सन १७५१ मध्ये काही रक्कम खर्च केल्याची इतिहासात नोंद आहे. पण यानंतर
आजपर्यंत तब्बल अडीचशे वर्षांत या तलावाच्या वाटय़ाला फक्त उपेक्षाच आली आहे.
तलावाचे खरे सौंदर्य ते इथल्या पाण्यात पण वर्षांनुवर्षांच्या उपेक्षेने तो सध्या
गाळानेच भरला आहे. महात्मा फुले जलसंधारण अभियानांतर्गत २००३ मध्ये या तलावातील
गाळ काढण्याच्या कामास सुरुवात झाली होती. पण हे कामही अन्य ‘सरकारी’ कामांप्रमाणे
अर्धवट अवस्थेत राहिले. खरे तर या तलावातील गाळ काढून इथे बारमाही पाणी अडवले -
साठवले तर या भागाची सिंचनाची मोठी सोय होईलच पण एका ऐतिहासिक स्मारकाचेही
चांगल्या रीतीने जतन होईल. तलाव व आजूबाजूच्या वनराईमुळे हे एक वनस्पती व
पक्षिनिरीक्षणासाठी चांगले सहल केंद्र ठरू शकते.
पुण्याबरोबरच राज्यातील अनेक शहरे सध्या चहू दिशांनी वाढत आहेत. या
वाढत्या नागरीकरण आणि अतिक्रमणांच्या विळख्यात या शहरालगतची असंख्य
स्मारके-निसर्गस्थळेही गुदमरू लागली आहेत. अशावेळी या स्थळांना वेळीच संरक्षण देत
विकासाच्या चार गोष्टी केल्या नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. असो,
पाण्याअभावी
एरवी रुक्ष, कोरडा वाटणारा हा मस्तानी तलाव व परिसर पावसाळ्यात मात्र रसिला होतो.
आजूबाजूच्या हिरवाईने त्याला तारुण्याची झालर चढते. या काळात कुठल्याही दिवशी इथे
यावे, तलावाच्या काठावर तासन्तास बसून राहावे. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावा,लाटांवर
विहार करणाऱ्या पाणकोंबडय़ा न्याहाळाव्यात. दिवेघाटाच्या डोंगरातले, उनपावसाचे
खेळ पाहावेत, निसर्ग शांतता अनुभवावी आणि समाधान घेऊन परतावे..!
संतोष घारे
[गर्जा महाराष्ट्र माझा]
Comments
Post a Comment