भुईकोट किल्ला - उदगीर

लातूर जिल्ह्यातील उदगीर हे ऐतिहासिक शहर आहे. तेथील उदयगिरी हा बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेला किल्लामहाराष्‍ट्रातील भुईकोट किल्‍ल्‍यांपैकी एक आहे. उदगीरचे प्राचीन नाव 'उदयगिरी' असे होते. काही ठिकाणी त्याचा उल्लेख 'उदकगिरी' नावाने करण्यात आला आहे. उदगीर नगरीचे पुराण काळापासून उल्लेख सापडतात. त्यामुळे उदगीरला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक असे दुहेरी महत्‍त्‍व आहे. सदाशिवराव (भाऊ) पेशवे यांनी 1760 मध्ये निजामाविरुद्ध उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्याची ऐतिहासिक घटना प्रसिद्ध आहे.



स्वातंत्र्य प्राप्तीनंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत उदगीरचा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. त्याकाळचे काही अवशेष आजही पाहता येतात. उदगीरच्या किल्ल्याचा उल्लेख अकराव्या शतकातील शिलालेखांसोबत पुराण कथांमध्येही आढळतो. 'करबसवेश्वर ग्रंथ' या पोथीतील कथेनुसार उदलिंग ॠषींनी शंकराची तपश्चर्या केली. शंकराने प्रसन्न होऊन ॠषींना 'मी या ठिकाणी लिंग रुपाने प्रगट होईन' असा आशिर्वाद दिला. त्या ठिकाणी जमिनीतून एक लिंग हळुहळू वर आले. पुढील काळात त्या ठिकाणी वस्ती वाढली. नगर वसले. त्यास उदलिंग ॠषींच्या नावावरून उदगीर हे नाव पडले. उदगीरच्या किल्ल्यात उदलिंग महाराजांचा मठ व शिवलिंग आहे.
प्रतिष्ठाण (पैठण) ही सातवाहनांची राजधानी होती. राजधानीकडे जाणा-या रस्त्यावर वसलेल्या उदगीर गावाची बाजारपेठ भरभराटीस आली. पुढील काळात त्या भागावर चालुक्यांचे वर्चस्व आले. त्यांची राजधानी बदामी येथे होती. त्यांच्या काळात हा किल्ला बांधला असावा. त्यानंतर राष्टकूट, चालुक्य (कल्याणी), देवगिरीचे यादव यांची सत्ता या भागावर होती. यादवांचा राजा सिंघनदेव यांच्या इ.स. ११७८ च्या शिलालेखात उदगीर नगराचा उल्लेख आहे. सहावा भिल्लम यादव हा उदगीरचा शासक असल्याचा उल्लेख आढळतो.
उदगीर हे यादवांचा शेवट झाल्यानंतर बहामनी काळात व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आले. बहामनी घराण्याचा नववा राजा महमदशहा बहामनी याने २२ सप्टेंबर १४२२ मध्ये गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलवली. बिदर हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे त्या काळात उदगीरचे महत्व वाढले. महमुदशहा बहामनीने इ.स. १४९२ मध्ये कासीम बरीदला उदगीर, औसा, कंधार हे किल्ले जहागिर म्हणून दिले. इ.स.१५२६ मध्ये बहामनी राज्याचे विघटन होऊन पाच शाह्या उदयास आल्या. त्यापैकी औसा येथील सुभेदार कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. बिदर राजधानी असलेल्या बरीदशाहीच्या राज्यातील उदगीर, औसा, कंधार हे प्रमुख किल्ले होते. त्यामुळेच त्यानंतरच्या काळात या किल्ल्यांच्या परीघात आदिलशाही विरुध्द अनेक लढाया झाल्या. मोगल बादशहा शहाजहानने २८ सप्टेंबर १६३६ मध्ये उदगीर किल्ला जिंकून घेतला.
बरीदशाहीच्या अस्तानंतर उदगीरच्या किल्ल्यावर आदिलशाही, मुघल, मराठे व शेवटी निजामाची सत्ता होती. या तीन शतकांच्या काळात उदगीर येथे एकमेव महत्वाची लढाई ३ फेब्रुवारी १७६० रोजी मराठे व निजाम यांच्यात झाली. त्याा लढाईचे नेतृत्व सदाशिवराव (भाऊ) पेशवे यांनी केले. त्या  लढाईत त्यांनी निजामाचा पराभव केला. त्यामुळेच पानिपतच्या युध्दाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्यात आले. पानिपतच्या युध्दात मराठ्यांच्‍या झालेल्या परभवानंतर निजामाने हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला.



उदगीर गावात पोचल्यानंतर गाडीने थेट किल्ल्यापर्यंत जाता येते. उदगीर गाव व किल्ला एकाच पातळीवर आहे. त्यामुळेच त्याला भुईकोट म्हणतात. मात्र किल्ल्याच्या तीन बाजूंना खोल दरी आहे. त्यामुळे किल्ल्याला तीन बाजूंनी नैसर्गिक संरक्षण लाभले आहे. उरलेल्या चौथ्या बाजूने म्हणजेच, गावाच्या दिशेने किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी चाळीस फूट खोल व बीस फूट रूंद खंदक खोदलेला आहे. खंदक दोन्ही बाजूंनी बांधून काढला आहे. पूर्वीच्या काळी खंदकात पाणी सोडले जाई व प्रवेशव्दारासमोर खंदकावर उचलता येणारा पूल ठेवलेला असे. तो पूल सुर्यास्तानंतर व युध्द प्रसंगी उचलून (काढून) घेतला जात असे. आज गावाच्या बाजूला असलेला खंदक बुजलेला असल्यामुळे त्यावरून थेट किल्ल्यात प्रवेश करता येतो.
उदगीरच्या चौबारा चौकातून किल्ल्याकडे जाताना नवीन बांधलेले भव्य दक्षिणाभिमुख प्रवेशव्दार दिसते. आत शिरल्यावर उजव्या बाजूस मूळ किल्ल्याच्या परकोटाचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार नजरेत भरते. परकोटाची तटबंदी आज अस्तित्वात नाही. परकोटात काही वास्तूंचे अवशेष आहेत. याशिवाय एक भव्य बांधीव तलाव आहे. या तलावातून किल्ल्याला पाणी पुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या काळी मातीचे पाईप व पाण्याची समपातळी राखण्यासाठी मधेमधे दगडात मनोरे बांधलेले होते. त्यापैकी एक मनोरा (उच्छवास) येथे पहाता येतो.


उदगीर किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. बाहेरील तटबंदीची उंची सत्तर फूट असून त्यात बारा बुरुज आहेत. बाहेरील तटबंदीवर दोन फूट रुंद व तीन फूट उंच च-या आहेत. आतील तटबंदी शंभर फूट उंच असून त्यात सात बुरुज आहेत. च-या, तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. खंदक ओलांडून पूर्वाभिमूख मुख्य प्रवेशव्दारापाशी आल्यानंतर प्रवेशव्दाराच्या दोन्ही बाजूंना दोन भव्य बुरूज दिसतात. त्याातील उजव्या बाजूच्या शेवटच्या बुरुजावर शरभ शिल्प व हत्तींची झुंज अशी दोन शिल्प आहेत. हत्तीचे आणखी एक शिल्प त्यामागील (आतील तटबंदीतील) अंधारी बुरुजावरील तटबंदीत आहे. किल्ल्याच्या डाव्या कोप-यात भव्य अष्ट्कोनी चांदणी बुरुज आहे. त्याा बुरुजावरही शरभ शिल्प व हत्तींची झुंज अशी दोन शिल्प आहेत. किल्ल्याला एकामागोमाग एक असे चार दरवाजे आहेत. त्यातील पहिल्या दरवाजाला लोहबंदी दरवाजा म्हणतात. त्याला सध्या लोखंडी दरवाजा बसवलेला आहे. तो चौदा फूट उंच व साडेसात फूट रूंद आहे. त्यालला सहा कमानी आहेत. या दरवाजातून आत गेल्यावर डावीकडे एक चिंचोळा मार्ग जातो. दोन तटबंदीतून जाणारा हा मार्ग उदगीर महाराजांच्या मठाकडे जातो. या मार्गाने थोडे पुढे गेले, की परकोटाच्या तटबंदीत असलेल्या बुरुजावर चढता येते. बुरुजावर ११ इंच x ११ इंच आकाराचा फारसी शिलालेख कोरलेला आहे. पण तो अस्पष्ट असल्याने वाचता येत नाही.

किल्ल्याच्या उत्तर टोकाला दोन महाल आहेत. त्यातील पहिला बेगम महाल, सम्स उन्निसा बेगम हिच्यासाठी बांधण्यात आला होता. महालाच्या एका भिंतीवर कबुतरांसाठी खुराडी बनवलेली आहेत. या महालाची प्रतिकृती समोरच्या बाजूला बनवलेली आहे. तो महाल उध्वस्त अवस्थेत आहे. या दोन महालांच्या मधल्या भागात दोन हौद व चार कोप-यात कारंजासाठी असलेले चार चौकोनी बांधीव खड्डे आहेत. बेगम महालाच्या बाजूला खास महाल आहे. पाच कमानी व दहा खांबांवर उभ्या असलेल्या या महालासमोर एक हौद व चार कारंजे आहेत. त्याक दोन महालांना लागून धान्य कोठाराची इमारत आहे. या इमारतीमधून जाणा-या रस्त्याने गेल्यावर खास महालाच्या मागे असलेला नर्तकी महाल आहे. या महालासमोर एक हौद व चार कारंजे आहेत.


नर्तकी महालातून पश्चिमेच्या तटबंदीच्या कडेकडेने प्रवेशव्दाराच्या दिशेने चालत गेल्यावर तटबंदीतच तीन मजली हवामहाल आहे. हवामहालाच्या समोर सात कमानी असलेली घोड्यांच्या पागांची आयताकार इमारत आहे. हवा महालातून उतरून तटबंदीच्या कडेकडेने चालत गेल्यावर भव्य चांदणी बुरुज पहायला मिळतो. या बुरुजावर झेंडा काठी व दोन प्रचंड मोठ्या तोफा आहेत. यातील बांगडी तोफ दहा फूट तीन इंच लांबीची आहे. दुसरी तोफ पंचधातूची आठ फूट चार इंच लांबीची आहे. या तोफेच्या तोंडाकडे मकर मुख कोरलेले आहे तर मागिल बाजूस सुर्याचे मुख कोरलेले आहे. अशीच एक तोफ औसा किल्ल्यावर देखील आहे. या तोफेवर अरबी भाषेतील दोन लेख कोरलेले आढळतात. चांदणी बुरुजावरून प्रवेशव्दारापाशी आल्यावर दुर्ग फेरी पूर्ण होते. संपूर्ण किल्‍ला पाहण्यासाठी दोन तास लागतात.
किल्‍ल्‍याच्‍या परिसरात इतरही काही वास्तू पाहण्याजोग्या आहेत. उदगीर पासून त्रेसष्ट किलोमीटर अंतरावर लातूर-उदगीर रस्त्यावर निलंगा गावात नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्याच रस्‍त्‍यावर (उदगीरपासून चौ-याहत्तर किलोमीटर अंतरावर) निलंगापासून अकरा किलोमीटरवर खरोसा येथे प्राचीन हिंदू लेणी व एक पडकी गढी पाहायला मिळते. औसा किल्लात पाहायचा असेल तर खरोसापासून पुढे तेवीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.
मुंबई, पुण्याहून उदगीरला जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. किल्ला उदगीर गावातच आहे. तिथपर्यंत चालत जाता येते किंवा वाहनानेही थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते. मुंबई, पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला पोचल्यानंतर लातूरहून खाजगी वाहनाने किंवा बसने उदगीर गाठता येते. उदगीर गावात लॉजमध्ये राहण्याची सोय होऊ शकते. गावात जेवणाची सोय आहे. उदगीरच्या किल्‍ल्‍यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
मराठवाड्यातील उदगीर, औसा, सोलापूर, नळदुर्ग हे किल्ले पुरातत्व खात्याच्या ताब्यात असून तेथे किल्ला सांभाळण्यासाठी कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. किल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ पुरातत्व खात्याने लावलेला सूचना फलक आहे. त्यावर खालील सूचना लिहिलेल्या आहेत.
१) किल्ल्याचे दरवाजे सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत उघडे राहातील.
२) किल्ला पहाण्यासाठी पुरातत्व खात्याची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे.
३) किल्ल्यात छायाचित्रण करण्यास मनाई आहे.
मराठवाड्यातील पुरातत्व खात्याचे कार्यालय औरंगाबाद येथे आहे. मुंबई, पुणे किंवा इतर कुठल्याही ठिकाणाहून आलेला पर्यटक औरंगाबाद येथून लेखी परवानगी घेऊन येणे शक्य नाही. कारण महाराष्ट्रात किल्‍ला पहाण्यासाठी अशा प्रकारे परवानगी घ्यावी लागते हे त्याला किल्ल्यात येईपर्यंत माहित नसते आणि असले तरी वरील किल्‍ले पाहण्यासाठी कोणीही औरंगाबादला जाऊन पुन्हा किल्‍ल्‍यापर्यंत जाण्याचे कष्ट घेऊन वेळ आणि पैसा वाया घालवणार नाही. तथापी गावातील स्थानिक लोक मात्र आपली गाई , गुरे, बक-या चरण्यासाठी बिनदिक्कत किल्ल्यात घेऊन येतात.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील किल्ले व त्यांची माहिती

दुर्ग भांडार नावाचा किल्ला