गरुडाचे घरटे (किल्ले राजगड)


गरुडाचे घरटे (किल्ले राजगड)
राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या वायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी-कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. त्या डोंगरावर हा किल्ला आहे. मावळभागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा किल्ल्याचा बालेकिल्ला आकाराने लहान असल्यामुळे राजकीय केंद्र म्हणून हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती,म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे. राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. दुर्गराज राजगड त्यांच्या महत्त्वाकांक्षेची उंची दाखवतो, तर किल्ले रायगड हा शिवाजीच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
सुवेळा माची
पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोडे वर आले की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरूज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला ही तुलनेने सोपी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे; एक ब्रम्हर्षी मंदिर आहे.



पद्मावती तलाव
गुप्तदरवाज्याकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा प्रमाणात साचला आहे. पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्र्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवाजीकालीन आहे. मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.








राजवाडा
रामेश्र्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. त्याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारोचे कोठार आहे. सदर ही गडावरची सर्वात महत्त्वाची अशी वास्तू आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.






गुंजवणे दरवाजा
गुंजवण दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाज्याला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरूज आहेत. गुंजवणे दरवाज्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे.या दरवाज्याच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरून श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरून असे अनुमान निघते की, हे प्रवेशद्वार शिवाजीपूर्व काळी बांधलेले असावे. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूस पद्मावती माची लागते.





पद्मावती मंदिर
२००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. शिवाजीने किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले, असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मूरती दिसतात. मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली आहे. तियाच्या उजव्या बाजूला लहान मूर्ती शिवाजीने स्थापित केलेली आहे. या दोन मूर्तीच्या मध्ये पहारेकऱ्यां देवड्या आहेत. शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे. या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे.



 संजीवनी माची
सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरूज लागतात. या तिन्ही बुरुजांवर शिवाजीच्या काळात प्रचंड मोठा तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरूज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळू दरवाजानेसुद्धा येता येते. आळू दरवाज्यापासून राजगडाची वैशिष्ट्य असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.





बालेकिल्ला
राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरूजही ठेवलेले आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तर बुरूज आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात.येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुरुजाच्या बाजूला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.

credit -  शोध महाराष्ट्राचा .

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील किल्ले व त्यांची माहिती

दुर्ग भांडार नावाचा किल्ला

भुईकोट किल्ला - उदगीर