नाणेघाट ते किल्ले जिवधनगड - माझी भटकंती..
नाणेघाट ते किल्ले जिवधनगड - माझी भटकंती..!!
खूप दिवसापासून नाणेघाट बद्दल ऐकून होतो.पण जाण्याचा योग काही येत नव्हता..शेवटी एक रविवार निवडला आणि कुणी नाही आले तरी जायचे पक्के ठरविले.आणि झालेही तसेच,नेहमीच्या सहकारयाकडून नाही चे सूर ऐकायला मिळाले.अपवाद होता मंगेशचा,मग काय क्षणाचाही विलंब न लावता संध्याकाळी ७ वाजता निघालो.आम्ही अगोदरच ठरविले होते कि जुन्नर अथवा लेण्याद्री येथे रात्रीचा मुक्काम ठोकायचा आणि पहाटे पहाटे नाणेघाट च्या वाटेला लागायचे.ठरविल्याप्रमाणे लेण्याद्री ला पोहोचण्यासाठी ४ तास लागले.लेण्याद्रीच्या भक्त निवासात रात्रीचा तळ ठोकला.झोपण्याचा खूप प्रयत्न केला,पण कसली झोप येते राव.सारखा नाणेघाट आणि जीवधन डोळ्यासमोर येत होता.शेवटी मध्यरात्री केव्हातरी डोळा लागला.
सकाळी ५ वाजता नाणेघाटाच्या दिशेने आमचा प्रवास सुरु झाला.अनोळखी रस्ता त्यात अंधार सोबतीला कुणीही नाही त्यामुळे थोडी भीती वाटातच होती.पण नाणेघाटाची ओढ आम्हाला पुढे पुढे नेत होती.साडेपाच नंतर प्रकाशाचे आगमन झाले..
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरी खोऱ्यातून वाहे,एक प्रकाश प्रकाश.
दरी खोऱ्यातून वाहे,एक प्रकाश प्रकाश.
या कवितेच्या ओळी आम्ही अनुभवत होतो.
एक एक गाव मागे सोडत आम्ही नाणेघाटाच्या दिशेने निघालो होतो.रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली जांभूळ आणि आंब्याची झाडे आमचे लक्ष वेधून घेत होती,नव्हे ती आम्हाला खुणावतच होती.आंब्याच्या झाडाखाली तर पाडांचा सडाच पडला होता.मंगेश तर कितीतरी आंबे गोळा करत होता.आणि जांभळ तर अगदी हाताला येतील इतक्या खाली होती.पण सूर्योदय होण्यापूर्वी आम्हाला नाणेघाटात जायचे होते त्यामुळे सोबतीला काही आंबे आणि जांभळ घेऊन आम्ही पुढे निघालो.रस्ता खूपच खराब होता,अगदी परीक्षा पाहणारा.पण आम्ही काही माघार घेणार्यांपैकी नव्हतो.
शेवटी साडेसात वाजता आम्ही नाणेघाटात पोचलो.आकाशात ढगांनी गर्दी केल्यामुळे सूर्य झाकून गेला होता.आम्ही सर्वप्रथम नानाच्या अंगठ्यावर गेलो.हे ठिकाण इतके उंच कि ढग आपल्या हाताला लागतील असे वाटत असते.नानाच्या अंगठ्यावर उभे राहून समोर पसरलेला विस्तीर्ण प्रदेश पाहता येतो
नाणेघाट हा पुरातनकालीन राजमार्ग असल्याचे इतिहासात वाचायला मिळते.सातवाहनांच्या काळात हा मार्ग तयार करण्यात आल्याचे इतिहास सांगतो.एक मोठा डोंगर खोदून कोकणात जाण्यासाठी रस्ता तयार केल्याचे पाहायला मिळते. या मार्गाला लागुनच एका अजस्त्र दगडामध्ये एक गुहा आहे.या गुहेत राहण्याची सोय देखील आहे.या गुहेत आतादेखील मुंबईचा ५ मुलांचा एक ग्रुप रात्री मुक्कामी होता. आम्हाला वाटले कि नाणेघाटात खूप पाउस पडत असेल,पण इथे तर पाउस नव्हता पण काही दिवसापूर्वी झालेल्या पावसाने सगळीकडे हिरवेगार दिसत होते.यातच आमचे फोटोसेसन सुरु झाले.या ठिकाणी आम्ही खूप फोटो काढलेत.
नाणेघाटात २ तास घालविल्यानंतर आम्ही निघालो किल्ले जिवधनगड कडे.हा ट्रेक आम्हाला पायीच करायचा होता त्यामुळे शेजारीच असणाऱ्या घरासमोर गाडी लावली आणि निघालो जिवधनगड कडे.पहिल्यांदाच जात होतो त्यामुळे रस्ता माहित असण्याचा प्रश्नच नव्हता.स्थानिक रहिवासी सुभाष आढारी यांना रस्ता विचारला असता त्यांनी सांगितले कि हे पांढरे निशाण पाहत चल म्हणजे तुम्ही गडावर पोहोचाल.आम्ही अगदी त्यांनी दाखविलेल्या मार्गावरूनच जात होतो.पण मधेच अचानक इतके धुके आले कि शेजारील व्यक्ती सुद्धा नीट दिसत नव्हती.आणि यातच आम्ही रस्ता भटकलो.
किर्र जंगलात तब्बल दीड तास आम्ही भटकत होतो.पण वाट सापडतच नव्हती.शेवटी आम्ही माघारी वळण्याचे ठरविले आणि आल्या रस्त्याने परत निघालो.जंगलाच्या बाहेर पडताच एक गाई राखणारा दिसला.तेव्हा कुठे आमच्या जीवात जीव आला.त्याने परत गडावर जाणारया वाटेवर आम्हाला आणून सोडले.आणि परत एकदा किर्र जंगलात आम्ही प्रवेश केला. दाट वाढलेल्या जंगलातून एक तास पायपीट केल्यानंतर जीवधन गडावर जाणा-या पाय-या दिसू लागल्या.परत एक तासाच्या अथक प्रयत्नानातर आम्ही गडावर पोहोचलो.
गडावर जुन्या काळातील दगडी भिंतीचे एक घर आहे.२ पाण्याचे टाके आहेत.गडाच्या एका टोकाला प्रचंड मोठा सुळका आहे.त्याला वानरलिंगी म्हणून ओळखले जाते.गडावरून नाणेघाटाचा रम्यं परिसर पाहता येतो.२ ते ३ तासात संपूर्ण गड पालथा घालता येतो.२ वाजण्याच्या दरम्यान आम्ही गड खाली उतरून परत पुण्याचा दिशेने निघालो.
क्रेडीट - शोध महाराष्ट्राचा




Comments
Post a Comment