असाच एक गड 'घनगड'
मुळशी आणि मावळातील आडवाटेला असणारे अनेक किल्ले तुमच्या माझ्या सारख्या ट्रेकर्सला नेहमीच खुणावत असतात. शहरी जिवनापासून अलिप्त असलेल्या या परिसरातील निसर्ग ट्रेकर्सला नेहमीच खुणावत राहतो. मुळशीच्या पश्चिमेला असाच एक गड आहे 'घनगड'. मावळातील या भागाला ‘कोरसबारस’ मावळ असेही म्हणतात. इतिहासात फारसा परिचीत नसलेला हा किल्ला कोळी सामंताकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि त्यानंतर मराठ्यांकडे आल्याचा या किल्ल्याचा पुसटसा उल्लेख आढळतो.
या किल्ल्यावर जाण्यासाठी ताम्हिणी घाटातून भांबर्डे गाव आणि त्यानंतर ऐकोले गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता आहे. पुणेकरांना ताम्हिणी घाटातून तर मुंबईकरांनी लोणावळ्यातून हा किल्ला गाठता येतो. लोणावळ्याहून भांबर्डे गावाकडे जाणारी बस पकडावी. हे अंतर 40 कि.मी आहे. त्यानंतर भांबर्डे गावातून ऐकोले गावात जाण्यासाठी साधारणतः 30 मिनिटांचा कालावधी लागतो.
घनगडावर जाण्यासाठी ऐकोले गावातूनच रस्ता आहे. गावाच्या बाहेरुनच डाव्या बाजुने जाणारा रस्ता थेट घनगडावर घेवून जातो. या वाटेने काही अंतर पार करताच गारजाई देवीचे मंदिर लागते. या मंदिरात “श्री गारआई महाराजाची व किले घनगडाची” असा शिलालेख कोरलेला आहे. मंदिराच्या समोरच एक तोफगोळा पडलेला आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूनेच किल्ल्यावर जाणारी वाट आहे.
किल्ल्यावर फार काही पाहण्यासाऱखे नाही, परंतू काही अंतर पार करताच डाव्या बाजूने जाणारा रस्ता एका पडक्या दरवाजातून थेट गडमाथ्यावर नेवून सोडतो. गडावर पडक्या घरांचे अवशेष आहेत. पाण्याची दोन-तिन टाकी आहेत. किल्ल्यावरून सुधागड, सरसगड आणि तैलबैलाची भिंत हा परिसर दिसतो. तसेच नाणदांड घाट, भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा सुद्धा दिसतात.



Comments
Post a Comment