चिखलदरा अमरावती
जैवविविधतेने संपन्न असलेल्या मेळघाटचा पूर्व वनप्रदेश म्हणजे चिखलदरा. समुद्रसपाटीपासून हे ठिकाण 3664 फुट उंचीवर आहे. विदर्भाचं नंदनवन आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून महाराष्ट्रात सुपरिचित आहे. गर्द वनराईतील ‘चिखलदरा’ भटकतांना येथील हिरवीगर्द वनराई आपल्याला पावलोपावली आपल्या मोहात पाडते. येथील निसर्गसृष्टीचं अवलोकन करतांना सातपुड्यातील उंच अशा दऱ्याखोऱ्यातून वावरतांना कधी-कधी जंगलाचा राजा वाघाचे तर कधी अस्वलाचे हमखास दर्शन होते. मात्र या सर्वांवर मात करतं ते येथील आल्हाददायक, मनमोहक निसर्ग सौंदय. त्यामुळेच येथे पर्यटकांची नेहमीच जथ्थे पहायला मिळतील.
अमरावती शहरापासून पन्नास किलोमीटरवर परतवाडा (तालुका अचलपूर) या तालुका स्थळापासून 55 किमी अंतरावर चिखलदरा. परतवाड्यावरुन चिखलदऱ्याला जातांना दूरवर सातपुडा पर्वताच्या विस्तीर्ण रांगा दृष्टीस पडतात. निसर्गाची विविध रुपे पर्यटकांचे मन मोहून टाकतात. घाटमेळ्याचा प्रवास सुरु झाला की गार वाऱ्याच्या झुळूका आल्हाददायक वाटू लागतात. नागमोडी वळणे, खोल-खोल दऱ्या आनंद घेत असतांना नानाविध रानपाखरांची आवाज ऐकू येतो. वृक्षलता पर्वतराजीवर लडिवाळपणे पहुडल्या असल्याचे दिसतात. तो एक सुखद अनुभव देतो.
पुढे मग विदर्भाचे नंदनवन असलेल्या थंड हवेच्या चिखलदऱ्याचे मनोहारी दर्शन होऊ लागते. मोरपिसाऱ्यासारखी सिल्व्हर ओकची झाडं मोहात पाडतात. वसंत ऋतूत आम्रवृक्षांच्या दुधाळ मोहराचा सुगंध दरवळत राहतो. याचवेळी मोहाची झाडंही दुधाळ आणि रसाळ फुलांनी लदबदली असतात.
ऐतिहासिक संदर्भ असलेल्या भीमकुंड, आवाजाचे पाच प्रतिध्वनी ऐकू येणारा पंचबोल, देवी पॉईंट, मोझरी पाईंट आणि जवळपास आठ नऊशे वर्षाचा इतिहास असलेला अबोल असा उपेक्षित ‘गाविलगड’ किल्ला आपल्याला साद घालतो. येथील सृष्टीचं मनोहारी रुप पर्यटकांना वेड लावते. कधी-कधी चिखलदऱ्याच्या रस्त्यावर वाघ, अस्वलाचेही दर्शन होते. चिखलदऱ्याच्या दोन्ही दिशांनी वृक्षलतारुपी हिरवा शालू कमी अधिक प्रमाणात बाराही महिने पांघरलेला दिसतो. थंड आणि शुद्ध हवा यातून मनाला उभारी मिळते. येथील निसर्गजीवनाचा स्पर्श भटकंतीस आलेल्या पर्यटकास ऊर्जा देतो.
चिखलदरा हे विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. हे ठिकाण ब्रिटीशांच्या राजवटीमध्ये उदयास आले. १८०३ मध्ये इंग्रजांनी गाविलगड किल्ला जिंकल्यावर तेथील लोक किल्ल्याच्या बाहेरील पहाडावर येऊन राहू लागले. हीच चिखलदऱ्याची पहिली वस्ती होय.
चिखलदऱ्यातील मनोहारी पॉईंन्ट
एका आवाजाचे पाच प्रतिध्वनी ऐकू येणारा पंचबोल - इको पॉईंट, मंकी पाँईंट, बेलाव्हिस्टा पॉईंट, लाँग पॉईंट, प्रॉस्पेट पॉईंट, बेलेन्टाईन पॉईंट, लेन पॉईंट, हरिकेन पॉईंट ही बहुतेक नावे ब्रिटीश अधिकाऱ्यांचीच आहेत. पावसाळ्यात ‘भिमकुंड’ पाहणाऱ्या पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत असते. जवळसपास हजार वर्षाचा इतिहास असलेला ‘गाविलगड’ किल्ला पाहणाऱ्या पर्यटकांना गत इतिहासात घेऊन जातो. चला तर मग एकदा तरी जाऊ या निर्सगाच्या कुशीत चिखदऱ्याला…
कसे पोहचाल
जवळचे विमानतळ- नागपूरपासून 4 तासांच्या अंतरावर
जवळेचे रेल्वे स्टेशन- बडनेरा, अमरावती
बससेवा – अमरावती- चिखलदरा (100 किमी अंतरावर)
नागपूर- चिखलदरा 230 कि.मी. एसटी व खासगी बसेस उपलबध
मुंबई- चिखलदरा 800 किमी अंतरावर




Comments
Post a Comment