मस्तानी तलाव ,सासवड ,पुणे

सोमवार १५ जुलै २०१३ , पुण्याजवळचा दिवे घाट ओलांडत सासवडला जाऊ लागलो , की डावीकडे दरीतील आखीव-रेखीव मस्तानी तलाव सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो. पावसाळ्यात तर भोवतालच्या साऱ्या डोंगर-टेकडय़ा हिरव्यागार होतात आणि पाण्याने भरलेला हा तलाव अधिकच उठून दिसतो. या ओल्या दिवसात मुशाफिरीसाठी या दिवेघाटात जरूर वाट वाकडी करावी. पुण्यापासून साधारण १७ किलोमीटरवर वडकी गाव. या गावातूनच एक गाडी रस्ता डोंगराच्या अगदी पायथ्याशी तलावावर आणून सोडतो. एरवी घाटातून एक भिंतवजा वाटणारे हे बांधकाम जवळ जाताच एक बुलंद वास्तू वाटू लागते. सभोवतालचे डोंगर अंगावर येतात. डोंगरांचा हा वेढा आणि विस्तीर्ण जलाशयाच्या पाश्र्वभूमीवर आपले खुजेपणही जाणवू लागते. थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमाने खरेतर साऱ्या पेशवाईचा इतिहासच भारावलेला आहे. या प्रेमाचा स्पर्श पुण्याभोवतीच्या काही स्थळ-वास्तूंच्या नशिबीही आला. यातलीच ही एक मस्तानी तलावाची जलवास्तू. असे म्हणतात , शूर योद्धा असलेले बाजीराव पेशवे त्यांच्या विश्रांतीच्या , निवांतक्षणी पुण्याबाहेर इथे या तलावावर येत असत. इथल्या डोंगर-दऱ्यांच्या , त्या...